मुंबई : क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस (सीजीटीएमएसई) ने आपल्या 25 वर्षांच्या प्रभावी प्रवासाचे स्मरण करत, रौप्य महोत्सव साजरा केला. या प्रसंगी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील आर्थिक सहाय्य, कर्ज धोका व्यवस्थापन आणि संस्थात्मक उत्कृष्टतेसाठी उल्लेखनीय योगदान दिलेल्या प्रमुख सदस्य ऋणसंस्थांचा (एमएलआय) सन्मान करण्यात आला. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमातून, भारतातील सूक्ष्म व लघु उद्योजकांना बिनजामिनी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सीजीटीएमएसईच्या कटिबद्धतेचे पुनःप्रतिबिंब उमटले.
सन्मान वितरण सीजीटीएमएसईचे अध्यक्ष आणि सिडबीचे सीएमडी मनोज मित्तल, सिडबीचे उपव्यवस्थापक संचालक प्रकाश कुमार आणि सीजीटीएमएसईचे सीईओ मनीष सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसबीआयचे उपव्यवस्थापक संचालक सुरेंद्र राणा, तसेच एसबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक अनिंद्य सुंदर पॉल आणि इतर अनेक वरिष्ठ बँक अधिकारी उपस्थित होते.
गारंटी कव्हरेज (रक्कम) व वर्षानुवर्षांची वाढ या निकषांवर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ला सर्वोच्च सन्मान मिळाला. युनियन बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक यांनी गारंटी कव्हरेज (संख्या) या विभागात आघाडी घेतली, तर खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँकेचा उल्लेखनीय सहभाग होता. बजाज फायनान्स, जना स्मॉल फायनान्स बँक, कर्नाटक विकास ग्रामीण बँक आणि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक यांना त्यांच्या-त्यांच्या श्रेणीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. डिजिटल नवकल्पना आणि विशेष पोहोच उपक्रमांसाठीही पुरस्कार देण्यात आले.
एनबीएफसी (NBFC) वर्गामध्ये बजाज फायनान्स लिमिटेडने गारंटी कव्हरेज (रक्कम) मध्ये प्रथम क्रमांक पटकावला, तर टाटा मोटर्स फायनान्स आणि एसएमएफजी इंडिया क्रेडिट यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. इतर प्रमुख सन्मानांमध्ये: बँक ऑफ इंडियाला नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी, इंडसइंड बँकला अनौपचारिक मायक्रो उद्योग (IME) पोहोच उपक्रमासाठी, पंजाब अँड सिंध बँकला सर्वात वेगवान वाढीसाठी, आणि बँक ऑफ बडोदाला स्थिर कामगिरीसाठी गौरवण्यात आले. येस बँक, इंडियन बँक, ऍक्सिस बँक आणि एसबीआय यांनाही सीजीटीएमएसईच्या उपक्रमांमध्ये सातत्याने दिलेल्या पाठिंब्यासाठी गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाद्वारे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनास बळ देण्याच्या आणि एक मजबूत क्रेडिट गॅरंटी यंत्रणा उभारण्याच्या सीजीटीएमएसईच्या अविरत प्रयत्नांची पुनःपुष्टी करण्यात आली.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें