मुंबई। इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावादरम्यान पश्चिम आशियात अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने १८ जून रोजी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले होते. २८ जूनपर्यंत, इराण आणि इस्रायलमधील संघर्षग्रस्त भागातून एकूण ४,४१५ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात सरकारला यश आले आहे.
भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) तीन सी-१७ विमानांसह १९ विशेष उड्डाणांद्वारे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले. प्रादेशिक एकतेचे प्रतीक म्हणून, मानवतावादी दृष्टीकोनातून भारत सरकारने शेजारील देशांतील नागरिकांच्या स्थलांतरासही सहाय्य केले. इराणमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये १४ 'ओसीआय' (भारताचे परदेशी नागरिक) कार्डधारक, ९ नेपाळी नागरिक, ४ श्रीलंकेचे नागरिक आणि एका भारतीय नागरिकाच्या १ इराणी जोडीदाराचा समावेश होता.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, तेहरान, येरेवन आणि अश्गाबात येथील भारतीय दूतावासांनी जमिनीवरील सीमा ओलांडण्यासह स्थलांतरितांना सुरक्षित मार्गाने जाण्यासाठी विशेष समन्वय साधण्यात आला. इराणमधून बहुतेक भारतीयांचे स्थलांतर मशहादमार्गे करण्यात आले. १८ ते २६ जून दरम्यान, १५ हून अधिक भारतीय राज्यांमधील विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक, यात्रेकरू आणि मच्छीमार अशा एकूण ३,५९७ नागरिकांना स्थलांतरासाठी १५ विशेष विमानांची सोय करण्यात आली होती. या सर्वांना येरेवन, अश्गाबात आणि मशहाद येथून मायदेशी परत आणण्यात आले.
इस्रायलमधून भारतीय नागरिकांना परत मायदेशी आणण्याची मोहीम २३ जून रोजी सुरू झाली. भारतीय नागरिकांना जमिनीवरील सीमेवरून जॉर्डन आणि इजिप्तमध्ये जाता यावे यासाठी तेल अवीव, रामल्लाह, अम्मान आणि कैरो येथील भारतीय दूतावासांनी त्या सरकारशी समन्वय साधला. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २२ ते २५ जून या कालावधीत अम्मान आणि शर्म अल शेख येथून तीन 'आयएएफ सी-१७' विमानांसह चार निर्वासन उड्डाणांद्वारे एकूण ८१८ भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, कामगार आणि व्यावसायिकांचा समावेश होता.
भारत सरकारने परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी आपली तीव्र वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. या मोहिमेदरम्यान सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल इराण, इस्रायल, जॉर्डन, इजिप्त, आर्मेनिया आणि तुर्कमेनिस्तानच्या सरकारांचेही त्यांनी आभार मानले. परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, भारतीय राजनैतिक मिशन इराण, इस्रायल आणि पश्चिम आशियातील स्थानिक अधिकाऱ्यांशी आणि भारतीय समुदायांशी सक्रियपणे संपर्कात असेल आणि भविष्यातील सर्वप्रकारच्या घडामोडींवर लक्ष ठेवून त्यावर आवश्यक प्रतिसाद दिला जाईल.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें