राज्यातील १९७९ अंगणवाड्या ‘बचपन इज ग्रेट वीक’मध्ये सहभागी
मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या ‘बचपन इज ग्रेट वीक’मध्ये तब्बल १,९७९ अंगणवाड्यांनी सहभागासाठी नोंदणी केल्यामुळे, बालपणाच्या सुरुवातीच्या टप्प्याचा उत्सव साजरा करणाऱ्या भारतातील प्रमुख राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर ठरले आहे. ‘प्रथम’च्या अंगणवाडी नेटवर्कद्वारे आणि खास मराठी नोंदणी उपक्रमातून सक्रीय करण्यात आलेल्या या केंद्रांनी देशव्यापी उत्सवात राज्यस्तरावर सर्वाधिक सहभाग नोंदवला. बालपणाची सुरुवातीची वर्षे केवळ भविष्याची तयारी नसून, तो आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, या मूलभूत सत्याकडे या उपक्रमाने लक्ष वेधले.
या अभूतपूर्व सहभागाचे महत्त्व केवळ संख्येपुरते मर्यादित नसून, अंगणवाडी सेविकांनी मुले व कुटुंबांशी साधलेला दैनंदिन संवाद या मोहिमेचा गाभा ठरला. एकस्टेप फाउंडेशनच्या पॉलिसी अँड पार्टनरशिप विभागाच्या प्रमुख दीपिका मोगिलिशेट्टी म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या सहभागाचा मुख्य गाभा तिथल्या अंगणवाडी सेविका होत्या; लहान मुले आणि कुटुंबांशी त्यांचा असलेला दैनंदिन संवाद त्यांना ‘बचपन इज ग्रेट वीक’च्या खऱ्या अर्थाने अग्रणी बनवणारा ठरला. प्रथमच्या विस्तृत जाळ्यामुळे आणि खास मराठीतील नोंदणी उपक्रमामुळे १,९७९ अंगणवाड्यांनी सहभागासाठी नोंदणी केली; ज्यातून बालविकासात समुदायाच्या सहभागासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण झाले.”
हा उत्सव अंगणवाड्यांच्या पलीकडे जाऊन सामुदायिक स्थळांपर्यंतही पोहोचला. मुंबईमध्ये ‘गोवंडी आर्ट्स’ आणि ‘डाउन टू अर्थ’ यांनी कला, सर्जनशीलता आणि मैदानी खेळांद्वारे मुलांना एकत्र आणले, तर नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात ‘दलाई लामा फाउंडेशन’ने हा उत्सव गावातील समुदायांपर्यंत नेला. खेळाची सत्रे, गोष्टी सांगण्याची वर्तुळे आणि अंगाई गीतांच्या उपक्रमांतून मुले, माता, पालक आणि स्थानिक मार्गदर्शक एकत्र आले.
‘बचपन इज ग्रेट वीक’ हा एकस्टेप फाउंडेशनच्या ‘बचपन मनाओ’ या उपक्रमाचा भाग असून, खेळ, सामाजिक जवळीक, सर्वांगीण कौशल्ये, शिक्षण, सर्जनशीलता, गोष्टी, निसर्ग आणि शांत वेळ या बालपणातील आठ चमत्कारांवर भर देतो. महागड्या सुविधांशिवाय केवळ एकत्र सांगितलेल्या गोष्टीतून, अंगाईतून किंवा निवांत क्षणातूनही बालपणास पाठबळ देता येते, हे या उपक्रमाने अधोरेखित केले.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें