मुंबई: भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी लोणावळा येथील प्रसिद्ध कैवल्यधाम परिसरात उपस्थितांना संबोधित करताना युवकांना जीवनशैलीतील तणाव, तुलना आणि अपयशाच्या दबावातून बाहेर पडण्यासाठी योगाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. "जीवनातील संघर्षांकडे अपयश म्हणून पाहिले जाऊ नये," असे प्रतिपादन त्यांनी केले. श्री कोविंद कैवल्यधामच्या १०२ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित 'स्थैर्य' या राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. युवकांचे मानसिक आरोग्य आणि मानसिक स्थैर्यामध्ये योगाची भूमिका या विषयावर केंद्रित असलेल्या या परिषदेचे अध्यक्षस्थान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व कैवल्यधामचे सल्लागार न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांनी भूषवले.
समारंभास संबोधित करताना रामनाथ कोविंद म्हणाले, “आजचे युवक सततच्या तुलनेच्या दबावाखाली जगतात. आपल्या युवकांनी हे समजून घेतले पाहिजे की संघर्ष म्हणजे अपयश नव्हे आणि बंद झालेला एखादा दरवाजा म्हणजे प्रवासाचा शेवट नसून ती दिशा बदलण्याची एक संधी असते. योग ही भारताच्या 'सॉफ्ट पॉवर'ची सर्वोत्तम अभिव्यक्ती आहे. त्यामुळे योगाची जगभरातील वाढती लोकप्रियता ही आपल्यावर एक मोठी जबाबदारी आणते. आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की योगाला केवळ एका आकर्षक वर्कआउट रुटीनपुरते मर्यादित ठेवले जाणार नाही.”
स्थापना दिनाच्या या विशेष संकल्पनेवर बोलताना कैवल्यधामचे सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इंडियन योगा असोसिएशनचे महासचिव सुबोध तिवारी यांनी सांगितले की, आजचे तरुण परीक्षा, वाढती स्पर्धा, तुलना आणि सतत सुरू राहणाऱ्या डिजिटल स्क्रीनच्या दबावामुळे मानसिक तणावाचा सामना करत आहेत. अशा वेळी युवकांना या तणावातून बाहेर काढण्यासाठी योगामध्ये अत्यंत प्रभावी आणि व्यावहारिक उपाय आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांनी योगाच्या उपचारात्मक मूल्यावर भर देताना सांगितले की, योग माणसाच्या मानसिक वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणतो. दैनंदिन जीवनातील तणावाच्या वादळात वाहवत न जाता माणसाला मानसिक स्थैर्य देण्याचे सामर्थ्य योगात आहे. तर बॉम्बे हायकोर्टाचे वरिष्ठ वकील आणि बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठक्कर म्हणाले की, आजचे युवक तात्काळ समाधान आणि सततच्या माहितीच्या महापुरात मानसिक थकवा व चिंतेचा सामना करत आहेत, ज्यावर मात करण्यासाठी 'स्थैर्य' विकसित करणे गरजेचे आहे.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दोन महत्त्वपूर्ण योग पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये डॉ. ओ. पी. तिवारी लिखित “प्राणायाम डिस्क्स्ड – ब्रेथ ऑफ मास्टर” हे गुरु-शिष्य संवादातून प्राणायामाची सोप्या भाषेत मांडणी करणारे पुस्तक, आणि डॉ. सतीश डी. पाठक लिखित “योगाभ्यास डॉक्टर के दृष्टीकोन से” या वैद्यकीय दृष्टिकोनातून योगाचे फायदे सांगणाऱ्या पुस्तकाचा समावेश आहे.
एनआयएमएचएएनएसचे माजी संचालक आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे माजी अध्यक्ष बी. एन. गंगाधर यांनी स्किझोफ्रेनिया आणि ऑटिझमसारख्या गंभीर विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योगाच्या वैज्ञानिक भूमिकेवर प्रकाश टाकला.
दुपारच्या सत्रात कैवल्यधामचे वैज्ञानिक संशोधन संचालक डॉ. आर. एस. भोगल, मुख्य सल्लागार डॉ. गणेश राव आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्वाती पांडे यांनी संशोधन आणि क्लिनिकल अनुभवांच्या आधारे युवा मन व योग यावर सखोल चर्चा केली. कार्यक्रमाचा समारोप डॉ. वैभव शर्मा आणि रिचा सौदा यांनी सादर केलेल्या “कबीर वाणी: अ जर्नी फ्रॉम साउंड टू सायलेन्स” या भावपूर्ण संगीतमय प्रस्तुतीने झाला.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें