मुंबई। मसाइ या भारतातील आघाडीच्या निष्पत्तीकेंद्री एडटेक प्लॅटफॉर्मने अप्लाइड एआय आणि एमएल इसेन्शिअल्समधील नवीन ४ महिन्यांचा ऑनलाइन प्रमाणन अभ्यासक्रम आयआयटी पटनातील आय हबच्या सहयोगाने सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम हिंदी, तेलुगू, मराठी आणि तमिळ भाषांमध्ये देऊ केला जाणार आहे, भारतभरात प्रादेशिक भाषांमध्ये दिला जाणारा हा पहिला आयआयटी पुरस्कृत अभ्यासक्रम आहे.
एआय आणि एमएल यांच्याशी निगडित कौशल्यांना असलेली मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे. नोकरीवर रुजू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून उमेदवाराला एआयवर आधारित साधने वापरता आली पाहिजे आणि व्यवसायाशी निगडित समस्या सोडवता आल्या पाहिजेत, अशी आज कंपन्यांची अपेक्षा असते. स्पर्धात्मक लाभ मिळवण्यासाठी एआय आणि एमएल महत्त्वपूर्ण असल्याचे ७० टक्के कंपन्यांचे मत आहे. निर्णय प्रक्रिया आणि व्यवसायाची निष्पत्ती यांत सुधारणा घडवून आणण्यासाठी एआय व एमएल यांमध्ये सुधारणा करण्याची ७५ टक्के कंपन्यांची योजना आहे. या स्थित्यंतरामुळे उपलब्ध नोकऱ्या आणि या नोकऱ्यांच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले गेलेले प्रतिभावंत यांच्यात स्पष्टपणे तफावत निर्माण झाली आहे.
श्रेणी-२ आणि श्रेणी-३ शहरांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार तंत्रज्ञानात्मक शिक्षण उपलब्ध करून देऊन ही तफावत भरून काढण्याचे उद्दिष्ट मसाइपुढे आहे. विद्यार्थ्यांना जटिल संकल्पना आपल्या भाषेत समजून घेण्याची तसेच सध्याच्या नोकऱ्यांच्या बाजारपेठेत आवश्यक असलेली व्यवहार्य कौशल्ये आत्मसात करण्याची संधी हा नवीन अभ्यासक्रम देतो.
मसाइचे सीईओ व सहसंस्थापक प्रतीक शुक्ला म्हणाले, “भारताच्या बऱ्याच मोठ्या भागात उत्तम प्रतिभा आहे पण रचनाबद्ध तंत्रज्ञान शिक्षणाची उपलब्धता मर्यादित आहे. प्रमुख महानगरांच्या बाहेर राहणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यापूर्वीच भाषेचा अडथळा येतो. हा अभ्यासक्रम हिंदी, तेलुगू, मराठी आणि तमिळ माध्यमात उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटी पटनासोबत काम केल्यानंतर आता आम्ही एआय आणि एमएलचे शिक्षण विद्यार्थ्यांच्या अधिक व्यापक गटांसाठी खुले करत आहोत. नोकरीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरील कर्मचाऱ्याला माहीत असणे अपेक्षित असलेल्या व्यवहार्य उपयोजनांवर अभ्यासक्रमात भर दिला गेला आहे आणि यामुळे अशा कौशल्यांची मागणी जलद गतीने वाढत असलेल्या नोकरीच्या बाजारपेठेत नोकरीसाठी सज्ज व्यावसायिकांचा पुरवठा भक्कम करण्यात मदत होईल, असे आम्हाला वाटते.”
भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी पटनामधील तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्र विश्लेषण आय-हब फाउंदेशनचे सीईओ डॉ. साईकिरण ओरुगंटी म्हणाले, “सर्व क्षेत्रांतील कंपन्या एआय आणि एमएलमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि पहिल्या दिवसापासून या तंत्रज्ञानांमध्ये कुशल असतील अशा प्रशिक्षित व्यावसायिकांची गरज स्पष्टपणे भासत आहे. अनेक सक्षम विद्यार्थ्यांना प्रगत अभ्यासक्रम शिकण्याचा आत्मविश्वास वाटत नाही, कारण साहित्य समजून घेण्यासाठी आवश्यक भाषेचे ज्ञान त्यांच्याकडे नसते. हा अभ्यासक्रम प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिला गेल्यामुळे ही तफावत भरून काढण्यात आणि एआय प्रतिभेचे अधिक समावेशक भंडार तयार करण्यात मदत होणार आहे. उद्योगक्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करणे तसेच देशातील तंत्रज्ञान मनुष्यबळ अधिक सक्षम व सज्ज करण्यात योगदान देणे हे मसाइसोबतच्या आमच्या सहयोगापुढील लक्ष्य आहे.”
या अभ्यासक्रमाची सुरुवात पायथन प्रोग्रामिंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशनने होते. मग यामध्ये रिग्रेशन, क्लासिफिकेशन, क्लस्टरिंग आणि मॉडेल इव्हॅल्युएशन आदी विषय घेतले जातात. विद्यार्थी पुढे डीप लर्निंग, न्युरल नेटवर्क्स, सीएनएन्स, आरएनएन्स, ट्रान्सफॉर्मर्स, रिएन्फोर्समेंट लर्निंग आणि कम्प्युटर व्हिजन या विषयांचाही अभ्यास करतात. या अभ्यासक्रमात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, जनरेटिव मॉडेल्स, ऑटोएमएल, एमएलओपीज आणि क्लाउड डिप्लॉयमेंट या विषयांचाही समावेश आहे. एआयची नीतीमत्तापूर्ण वापर हा विषय सर्व मोड्यूल्समध्ये आहे.
कस्टमर सेगमेंटेशन, इमेज क्लासिफिकेशन आणि टेक्स्ट बेस्ट अॅप्लिकेशन्स यांसारख्या प्रकल्पांवर विद्यार्थी काम करणार आहेत. एआय आणि एमएल तंत्रांचा उपयोग व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी करण्याची आपली क्षमता दाखवून देणारा पोर्टफोलिओही ते विकसित करणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तसेच मूल्यमापन पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना विश्लेषण आय हब आयआयटी पटनातर्फे प्रमाणपत्रेही दिली जाणार आहेत.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें