जसलोक हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार
मुंबई। महाराष्ट्रातील जळगावमधील एका २५ वर्षीय महिलेला गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून कानात हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा "व्हूशिंग" असा आवाज येत होता. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे झालेल्या मिनिमली इनव्हेसिव्ह प्रक्रियेनंतर तिला या त्रासापासून पूर्णपणे आराम मिळाला आहे. या महिला रुग्णाच्या केसमधून निदर्शनास येते की, रक्तवाहिन्यांशी संबंधित मूळ कारण ओळखून अनेक वर्षांच्या अनिश्चिततेनंतर पल्साटाईल टिनिटसच्या रुग्णांवर प्रभावी उपचार केले जाऊ शकतात.
या महिला रुग्णाला हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा सतत व्हूशिंग आवाज येत होता. वर्षानुवर्षे अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊनही आणि विविध चाचण्या व उपचार करूनही तिला कायमस्वरूपी आराम न मिळता हा त्रास सहन करावा लागत होता. अखेर तिने मुंबईत येऊन जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतला.
जसलोक हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. फाली पोन्चा, एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन डॉ. सुधीर आंबेकर आणि हेमॅटोलॉजिस्ट डॉ. समीर शाह यांच्या टीमने रुग्णाची एमआरआय व एमआरव्ही तपासणी केली. यामध्ये मेंदूतील मुख्य रक्तवाहिनी अरुंद झाल्याचे ('व्हेनस सायनस स्टेनोसिस') निदान झाले, ज्यामुळे रक्ताचा प्रवाह विस्कळीत होऊन कानात लयीत "व्हूशिंग" आवाज येत होता.
उपचार म्हणून रुग्णावर 'मिनिमली इनव्हेसिव्ह व्हेनस सायनस स्टेंटिंग' प्रक्रिया करून रक्तवाहिनीचा मार्ग रुंद करण्यात आला. स्टेंट बसवताच ५ वर्षांपासून असलेला पल्साटाईल टिनिटसचा त्रास तात्काळ दूर झाला.
"या आजाराचे अनेकदा चुकीचे निदान केले जाते किंवा मानसिक ताण समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र, योग्य निदानानंतर मांडीतील शिरेद्वारे मेंदूत कॅथेटर नेऊन स्टेंट बसवण्याच्या 'मिनिमली इनव्हेसिव्ह' प्रक्रियेमुळे लक्षणे त्वरित दूर होतात. कमी चिरफाड असणाऱ्या या उपचारांमुळे रुग्णाला अवघ्या दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला," असे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन डॉ. सुधीर आंबेकर म्हणाले.
पल्साटाईल टिनिटस हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे, ज्यामध्ये रुग्णाला कानात हृदयाच्या ठोक्यांच्या लयीत "व्हूशिंग" किंवा ठोक्यांसारखा आवाज ऐकू येतो. जगभरात १४.४% प्रौढांना टिनिटसचा त्रास असला, तरी पल्साटाईल टिनिटसचे प्रमाण एकूण केसेसमध्ये १०% पेक्षा कमी आहे. ऑटॉलॉजीच्या एका अभ्यासानुसार, नव्या रुग्णांपैकी केवळ ०.०९% लोकांमध्येच याचे निदान होते; तसेच तीव्र केसेसची वेगळी व्याख्या नसल्याने याच्या तीव्रतेबाबत अजूनही स्पष्ट आकडेवारी उपलब्ध नाही.
"पल्साटाईल टिनिटसकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याचे सखोल मूल्यमापन होणे गरजेचे आहे. ही केस आठवण करून देते की, सतत राहणाऱ्या आणि स्पष्ट न झालेल्या लक्षणांचे काही वेळेस उपचारायोग्य कारण असू शकते. त्यामुळे ‘काहीही बिघाड नाही' असे ऐकल्यानंतर रुग्णांनी आशा सोडता कामा नये," असे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. फाली पोन्चा म्हणाले.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें