मुंबई/टोकियो : भारताच्या समृद्ध सांस्कृतिक कलाकृतींचे एक प्रभावी प्रदर्शन म्हणून टोकियोमधील भारतीय दूतावासाने 'इंडिया म्हणजेच भारत २०२५ - अमृतकाळाचा जल्लोष' या कार्यक्रमांतर्गत १२ तास चालणाऱ्या सांस्कृतिक महाकुंभाचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमात लक्षवेधक सादरीकरणांची अखंड मालिका सादर करण्यात आली, ज्यामध्ये भारताच्या शास्त्रीय आणि लोकपरंपरेची अनोखी अनुभूती उपस्थितांना मिळाली.
महाकुंभाचे उद्घाटन भारताचे सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हर्च्युअल) झाले. टोकियोमधील एडोगावा शहराचे महापौर ताकेशी सैतो, राजदूत सिबी जॉर्ज आणि मॅडम जॉइस सिबी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. याद्वारे भारत आणि जपानी सांस्कृतिक मूल्यांच्या संगमाचे प्रतीक दर्शविण्यात आले.
दिवसभर येथील रंगमंच भारताच्या कलात्मक वारशाचा एकप्रकारे जिवंत गालीचा बनला. यामध्ये शास्त्रीय प्रकार आघाडीवर होते: मसाको सातौ ग्रुपचे कथक तराणा; सान्या आणि शुभ्रा यांचे भरतनाट्यम; योको किता, मयुमी फुकुशिमा आणि सचिको इतो यांचे सुरेख ओडिसी सादरीकरण आदींनी प्रेक्षकांना मंत्र:मुग्ध केले. कलाकार एरिना कसाई यांनीही भारतीय शास्त्रीय नृत्याचे वाढते जागतिक आकर्षण अधोरेखित करणारे एकल भरतनाट्यम या वेळी सादर केले.
संगीताच्या क्षेत्रात शिगेरू मोरियामा आणि अकिको कोकुबो यांची तबला-सितार जुगलबंदी, मोरियामा ग्रुपचे एकल तबला वादन आणि धर्मराजन ग्रुपच्या एक भावपूर्ण गायनाने येथील वातावरण ध्वनिमय झाले. सुरंजना सरकारच्या जागृत करणाऱ्या रवींद्र संगीत सादरीकरणाने मध्यांतरात एक काव्यात्मक अनुभूती आली. कार्यक्रमात भारतातील विविध लोकपरंपरा जोमाने सादर करण्यात आल्या. अवध रिदम ग्रुप आणि एमबीडीएस ग्रुपने उत्स्फूर्त राजस्थानी नृत्य सादर केले, तर देबप्रिया मुझुमदार यांनी बंगालच्या मातीतील लयींना जिवंत केले.
निधीश करिमबिल आणि त्यांच्या पथकाने सादर केलेल्या दमदार कलारीपयट्टू प्रदर्शनाने भारताच्या युद्धपरंपरेच्या भावनेला उजाळा मिळाला. आसाम बोर्डोसिलास ग्रुपने ईशान्येकडील चैतन्य दाखवले, तर राहुल भारती ग्रुपच्या भांगड्याने येथील वातावरणात उत्साह निर्माण केला. कर्नाटकचा समृद्ध नृत्य-नाटक प्रकार, श्रीकला बोलाजेचा 'यक्षगान' हा सादरीकरणाचा एक उत्कृष्ट नमुना होता. अयाको सेकिमोटोच्या चरिका ग्रुपच्या पंजाबी नृत्य सादरीकरणामुळे सायंकाळी लयबद्धता दिसून आली, या वेळी पंजाबी गाण्यांना प्रेक्षकांनी दाद देत ठेका धरला.
महाकुंभासारख्या असाधारण सांस्कृतिक संगमाने केवळ भारताची कलात्मक खोलीच नाही तर परदेशात त्याच्या सौम्य शक्तीच्या वाढत्या प्रतिध्वनीला देखील अधोरेखित केले. या सांस्कृतिक महाकुंभाद्वारे भारत आणि जपानची परंपरा, कामगिरी आणि सांस्कृतिक राजनैतिकतेबद्दलची सामूहिक शक्ती पुन्हा अधोरेखित झाली.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें