मुंबई। “विकसित भारतासाठी प्रतिभा निर्मिती: उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील अधिक मजबूत सहकार्याद्वारे भविष्यासाठी सक्षम कौशल्यनिर्मिती” या विषयावर टीमलीज एडटेक तर्फे मुंबईत उद्योग क्षेत्रातील गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली. दोन तास चाललेल्या या परिषदेत सुमारे २५ सीएचआरओ, एचआर प्रमुख, सीएसआर प्रमुख आणि विविध उद्योगांतील वरिष्ठ नेते सहभागी झाले.
आयआयटी भिलाईचे संचालक प्रा. राजीव प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, डिजिटलायझेशन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे उद्योग आणि रोजगाराच्या स्वरूपात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर भारताला भविष्यात कोणत्या प्रकारच्या कौशल्यसंपन्न मनुष्यबळाची गरज भासेल, यावर चर्चा करण्यात आली.
उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील संबंध केवळ भरतीपुरते मर्यादित न राहता प्रतिभा निर्मितीच्या प्रक्रियेत उद्योगांचा अधिक सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल, यावर परिषदेत भर देण्यात आला. अभ्यासक्रम निर्मितीत उद्योगांचा सहभाग, प्रत्यक्ष उद्योगाधारित प्रकल्प, इंटर्नशिप, मार्गदर्शन, अनुप्रयुक्त संशोधन आणि विद्यार्थ्यांना कामाच्या ठिकाणचा प्रत्यक्ष अनुभव उपलब्ध करून देणे हे चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे होते.
मजबूत शैक्षणिक पाया असण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता, डिजिटल कौशल्ये, बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष व्यावसायिक वातावरणाची समज विकसित होणे आवश्यक असल्याचेही चर्चेत अधोरेखित करण्यात आले.
टीमलीज एडटेकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु रूज म्हणाले, “विकसित भारतासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ तयार करायचे असेल तर शिक्षण आणि रोजगार या दोन स्वतंत्र टप्प्यांप्रमाणे पाहता येणार नाही. उद्योगांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केवळ तयार मनुष्यबळाची निवड करणारे घटक न राहता प्रतिभा निर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय भागीदार व्हायला हवे. अभ्यासक्रमातील योगदान, प्रत्यक्ष प्रकल्प, मार्गदर्शन आणि कार्यस्थळाचा अनुभव यामुळे विद्यापीठे आणि उद्योग यांच्यात अधिक मजबूत आणि परिणामकारक नाते निर्माण होऊ शकते.”
शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्य अधिक संरचित, व्यापक आणि परिणामाभिमुख कसे करता येईल, यावरही चर्चा झाली. अनुभवाधारित शिक्षण, नव्या कौशल्यांची ओळख, प्राध्यापक आणि उद्योग यांच्यातील परस्पर सहभाग तसेच उच्च शिक्षणात उद्योगांचा सातत्यपूर्ण सहभाग या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
आयआयटी भिलाईचे संचालक प्रा. राजीव प्रकाश म्हणाले, “विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना मजबूत संकल्पनात्मक पाया देणे आवश्यक आहे; मात्र त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष समस्यांवर उपयोग करण्याची संधी मिळाल्यास त्याचे महत्त्व अधिक वाढते. शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील अर्थपूर्ण सहकार्यामुळे शिक्षणाला समकालीन उद्योगविश्वाचा संदर्भ मिळू शकतो, तसेच भविष्यात आवश्यक असणारी कौशल्ये विकसित करण्याच्या प्रक्रियेत उद्योगांनाही सक्रिय योगदान देता येते.”
या गोलमेज परिषदेतून समोर आलेले महत्त्वाचे मुद्दे टीमलीज एडटेक कडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या “टैलेंट क्रिएशन फॉर विकसित भारत" या श्वेतपत्रिकेचा भाग असतील. या श्वेतपत्रिकेत उद्योग क्षेत्राच्या प्राधान्यक्रमांसह विद्यार्थ्यांची उद्योगसिद्धता, रोजगाराच्या संधी आणि नवोन्मेष वाढवण्यासाठी आवश्यक शिफारसी मांडण्यात येतील.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें