प्रेस कॉन्फरन्समध्ये ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे अनावरण; १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान मुंबईत रंगणार क्रिकेटचा थरार
मुंबई: दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया (DCCBI), S4UA फाउंडेशन आणि दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन (DWCA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘ऑल एबिलिटी राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा २०२६’ची घोषणा मुंबईत करण्यात आली. दिव्यांग खेळाडूंना आपली क्रीडा प्रतिभा दाखविण्यासाठी, स्पर्धात्मक क्रिकेटचा अनुभव घेण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
मुंबईतील द सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पर्धेच्या ट्रॉफीचे आणि अधिकृत टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. यावेळी इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे सीकॉस्ट, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सीकॉस्ट आणि इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवत या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला.
या कार्यक्रमाला इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे सीकॉस्टच्या अध्यक्षा शैलजा नायर, रीता वर्मा, सरोज मायादेव आणि वर्षा; रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सीकॉस्टचे अध्यक्ष दिलीप ठक्कर सुनील देवनानी; इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या अध्यक्षा दीना पारेख, कमलिनी पारेख, नयना धांकी, प्रीती भगत, मीना जोशी उपस्थित होत्या. द सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षा रेणुका नायर आणि भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मनीष शर्मा यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
याशिवाय DCCBI चे संयुक्त अध्यक्ष व व्हीलचेअर क्रिकेट युनिटचे अध्यक्ष डॉ. भगवान तलवारे, महासचिव हारून राशिद, S4UA फाउंडेशनच्या संस्थापक पूजा मेहरा आणि DCCBI चे संयुक्त सचिव तसेच दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सचिव रमेश सरतापे आणि अभिनेता वरदान पुरी यांच्यासह अनेक पदाधिकारी, समर्थक आणि मान्यवर उपस्थित होते.
१ ते ४ नोव्हेंबरदरम्यान मुंबईत स्पर्धा
ही स्पर्धा १ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबईतील अंधेरी (पश्चिम), वीरा देसाई रोड येथील राजे शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत दिव्यांग क्रिकेटच्या तीन प्रमुख प्रकारांचा समावेश असेल:
• व्हीलचेअर क्रिकेट
• शारीरिक दिव्यांग खेळाडूंसाठी स्टँडिंग क्रिकेट
• दिव्यांग महिला क्रिकेट
व्हीलचेअर क्रिकेट आणि स्टँडिंग क्रिकेट प्रकारात महाराष्ट्र, गुजरात आणि जम्मू-काश्मीरचे संघ सहभागी होतील. दिव्यांग महिला क्रिकेट प्रकारात महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानचे संघ आमनेसामने येतील.
याशिवाय मुंबई डेफ क्रिकेट आणि विदर्भ डेफ क्रिकेट यांच्यात विशेष प्रदर्शनीय सामना खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत एकूण १३ सामने होणार असून त्यामध्ये ९ साखळी सामने, ३ अंतिम सामने आणि १ प्रदर्शनीय सामना यांचा समावेश असेल. सर्व सामने टी-२० स्वरूपात खेळविले जातील.
मान्यवरांची प्रतिक्रिया
डॉ. भगवान तलवारे, संयुक्त अध्यक्ष व व्हीलचेअर क्रिकेट युनिटचे अध्यक्ष, DCCBI म्हणाले, “ऑल एबिलिटी राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा ही दिव्यांग खेळाडूंना पुढे जाण्यासाठी आणि आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे. आपल्या खेळाडूंमध्ये कौशल्य, शिस्त आणि जिंकण्याची जिद्द आहे. त्यांच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ, ओळख आणि सन्मान मिळणे आवश्यक आहे. अधिकाधिक दिव्यांग खेळाडूंनी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सहभागी होऊन आपल्या कामगिरीतून इतरांना प्रेरणा द्यावी, हा आमचा प्रयत्न आहे.”
हारून राशिद, महासचिव, DCCBI म्हणाले, “भारतात दिव्यांग क्रिकेट अधिक मजबूत करणे आणि खेळाडूंना प्रगतीच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. व्हीलचेअर क्रिकेट, स्टँडिंग क्रिकेट आणि दिव्यांग महिला क्रिकेट या तिन्ही प्रकारांना एकाच स्पर्धेत स्थान देणे ही समावेशक क्रीडा क्षेत्राप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीची साक्ष आहे. या उपक्रमामुळे अधिक खेळाडू, कुटुंबे आणि संस्था दिव्यांग क्रिकेटच्या प्रोत्साहनासाठी पुढे येतील, अशी आम्हाला आशा आहे.”
पूजा मेहरा, संस्थापक, S4UA फाउंडेशन म्हणाल्या, “आम्ही गेल्या जवळपास दहा वर्षांपासून विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी खेळाच्या माध्यमातून संधी निर्माण करण्याच्या दिशेने कार्यरत आहोत. शाळांमध्ये क्रीडा सुविधा विकसित करणे, प्रशिक्षण, कोचिंग कॅम्प आणि विविध विकासात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून खेळ हा मुलांच्या जीवनाचा नियमित भाग व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. याच विचारातून आम्ही या स्पर्धेशी जोडले गेलो आहोत. दिव्यांग खेळाडूंना मोठे व्यासपीठ, उत्तम ओळख आणि आपली प्रतिभा सिद्ध करण्याच्या अधिक संधी मिळाव्यात, हा आमचा उद्देश आहे. खेळ आत्मविश्वास वाढवतात, शिस्त शिकवतात आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देतात.”
रमेश सरतापे, संयुक्त सचिव, DCCBI आणि संस्थापक सचिव, DWCA म्हणाले, “दिव्यांग क्रिकेटच्या विविध प्रकारांतील खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आणून राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची संधी देणे ही या स्पर्धेची मोठी उपलब्धी आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील संघांचे मुंबईत स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. ही स्पर्धा रोमांचक क्रिकेटसोबतच देशातील दिव्यांग क्रिकेटच्या विकासाला नवी दिशा आणि गती देईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
समावेशक क्रीडा चळवळीला नवी दिशा
‘ऑल एबिलिटी राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा २०२६’ ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून समान संधी, आत्मविश्वास आणि सामाजिक समावेशाला प्रोत्साहन देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. खेळाडूंची प्रतिभा, मेहनत आणि खेळभावना कोणत्याही शारीरिक मर्यादेवर अवलंबून नसते, हा संदेश या स्पर्धेतून दिला जाणार आहे. वर्धन पुरी यांच्या पाठिंब्यामुळे या उपक्रमाला व्यापक ओळख मिळेल आणि अधिकाधिक लोक दिव्यांग खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी पुढे येतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.
“एक राष्ट्र, एक खेळ, एक जज्बा, एक समावेशक भविष्य” या संदेशासह ही स्पर्धा खेळाडूंच्या प्रतिभेचा आणि यशाचा उत्सव साजरा करणार असून क्रीडा क्षेत्र सर्वांसाठी अधिक सुलभ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन (DWCA) विषयी
दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व्हीलचेअर महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शारीरिक दिव्यांगत्व असलेल्या खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. खेळाडूंचे सक्षमीकरण, नवोदित प्रतिभेला प्रोत्साहन, सर्वसमावेशक खेळांचा प्रसार आणि स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना अधिक ओळख व प्रगतीच्या संधी मिळवून देणे, हे असोसिएशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. DWCA ही डिफरेंटली एबल्ड क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया (DCCBI) शी संलग्न आहे.
दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया (DCCBI) विषयी
दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया (DCCBI) देशभरात दिव्यांग क्रिकेटच्या प्रसारासाठी आणि विकासासाठी कार्य करते. शारीरिक दिव्यांगत्व असलेले खेळाडू, व्हीलचेअर क्रिकेटपटू आणि दिव्यांग महिला क्रिकेटपटू यांच्यासाठी स्पर्धा, कौशल्य विकास आणि सर्वसमावेशक क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून संधी निर्माण करणे, हे बोर्डाचे उद्दिष्ट आहे. DCCBI भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघ आणि भारतीय शारीरिक दिव्यांग क्रिकेट संघाचे व्यवस्थापनही करते. भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाने दोन आशिया कप स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून बांगलादेश आणि नेपाळसह विविध देशांमध्ये अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. भारतीय शारीरिक दिव्यांग क्रिकेट संघानेही आशिया कप जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे.
S4UA फाउंडेशन विषयी
S4UA फाउंडेशन सामाजिक परिवर्तन, सर्वसमावेशक विकास, वंचित समुदायांचे सक्षमीकरण आणि समान संधींना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. विविध उपक्रम आणि भागीदारीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला सहभागी होण्याची, प्रगती करण्याची आणि स्वतःच्या क्षमतेनुसार यश मिळवण्याची संधी मिळेल, असा समाज घडवण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें